कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो ― व. पु. काळे

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो - व. पु. काळे या कवितेच्या माध्यमातून संसार कसा हवा असतो व प्रत्यक्षात संसार कसा चालतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता जितकी गमतीशीर वाटते तितकीच भयाण वास्तवही मांडते.
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो ― व. पु. काळे

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे "लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात". पण त्या लग्नाच्या गाठी खरंच स्वर्गात बांधल्या जातात का हा मात्र संशोधनाचा आणि मान्यतेचा विषय आहे. लग्नाविषयी अनेकांची अनेक मते आहेत तसेच या विषयावर भरपूर लिहिले गेले आहे. लग्नावर हास्यविनोदही भरपूर करण्यात येतात. नवरा-बायकोवरती सुद्धा जोक्स बनवले जातात.

लग्नाच्या कविता ही खुप फेमस आहेत. यामध्ये व. पु. काळे यांची ही उपहासात्मक कविता खुप पॉपुलर आहे. या कवितेच्या माध्यमातून वपु नी संसार कसा हवा असतो व प्रत्यक्षात संसार कसा चालतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता जितकी गमतीशीर वाटते तितकीच भयाण वास्तवही मांडते.

खरा संसाराचा गाडा कसा चालतो आणि खरंच लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात का ते खालील कविता वाचून तुम्हीच सांगा. कंमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही बरं का!!!



कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो


जन्मोजन्मीचं वैर काढत तो...

दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो,

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,

देव स्वर्गात बांधत असतो.


लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस

लग्नानंतर राहत नाही,

एकदा लग्न लावून दिलं की

देवसुद्धा खाली पाहत नाही.


मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,

तिला भलताच चक्रम वाटायला लागतो

आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा

प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.



आपला नवरा बैल आहे,

असं प्रत्येक बाईला वाटत असतं...

त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख

तिच्या मनात दाटत असतं.


त्याचा तो गबाळा अवतार...

तिला नीट्नेटकं राहयचं असतं.

तिला 'चार दिवस सासूचे' तर...

त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.


लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ

पळत कसला... रांगत असतो,

... कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,

देव स्वर्गात बांधत असतो.



ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,

असं प्रत्यक्षात घडत नाही.

त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,

ती त्याच्या आकाशात उडत नाही.


तो गच्चीत तिला घेऊन जातो,

इंद्रधनुष्यावर चालायला...

ती सोबत पापड कुरड़या घेते,

गच्चीत वाळत घालायला.


त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची

लखलखती शुक्राची चांदणी असते,

हिच्या डोक्यात गोडा मसाला

आणि वर्षभराची भाजणी असते.


आपली बायको म्हैस आहे,

असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो.

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो.

― व. पु. काळे


Post a Comment

0 Comments