नोट शंभरची, गुरुकिल्ली जगण्याची! - धनंजय देशपांडे

नोट शंभरची, गुरुकिल्ली जगण्याची! - धनंजय देशपांडे प्रेरणादायक विचार, प्रेरक कथा, मराठी मोटिवेशन, जीवन जगताना, Motivational Story, how to start life
नोट शंभरची, गुरुकिल्ली जगण्याची! - धनंजय देशपांडे

नोट शंभरची, गुरुकिल्ली जगण्याची!
(तीन मिनिट वेळ असेल तर जरूर वाचा)
> धनंजय देशपांडे

जुनी घटना आहे. पुण्यातील एका एमबीए कॉलेजवर मी व्याख्यानासाठी गेलेलो. परीक्षा झाल्यावर जगाच्या बाजारात यशस्वी कसे व्हावे, साधारण या विषयावर बोलण्यासाठी मी तिथं निमंत्रित होतो. त्यावेळी मी सुरुवातीला एक वेगळा प्रयोग केला अन तो यशस्वी झाल्याचे नंतर समजले. तर त्यावेळी मी नेमकं काय केलं, ते इथं सर्वाना सांगतोय.

व्यासपीठावरून मी सुरुवातीलाच सांगितलं की, आज लेक्चर वगैरे देऊन बोअर करणार नाहीये तर जस्ट गप्पा मारूया. (1 मिनिटात सगळे आपोआप रिलॅक्स झाले) नंतर म्हणालो, तुमच्याकडे शंभर रुपयांची नोट असेलच, तर ती खिशातून काढून हातात धरा. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी एकमेकांकडून घ्या." त्याप्रमाणे सर्वानी शंभरची नोट हातात धरली.

मी : "आता ती नोट त्याच हाताने चुरगळा. मात्र इतक्या जोरात नको की फाटेल, अन काळजी करू नका, तुमची नोट वाया जाणार नाही तर उलट आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देत राहील, ट्रस्ट मी"
त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी नोट हळुवार चुरगाळली.
मी : "आता अजून थोडी जास्त व बारीक चुरगळा"
त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी नोट अजून बारीक चुरगाळली.
मी : आता उभे राहा व ती नोट पॅन्टच्या मागच्या खिशात खुपसून टाका.
विद्यार्थ्यांनी उभे राहून ती चुरगळून बारीक गोळा झालेली नोट मागच्या खिशात कोंबली
मी : "आता तब्येतीत मस्त रिलॅक्स बसून घ्या."
विद्यार्थी खाली बसले.
मी : "2 मिनिट शांत बसा, वाटल्यास तुमच्या समोर पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात न, त्यातलं थोडं पाणी प्या" काही विद्यार्थ्यांनी पाणी पिले.

दोन मिनिट गेल्यावर त्यांना म्हणालो की,
"आता उठून उभे राहा व ती खिशातली नोट काढून हातात घ्या"
त्याप्रमाणे सर्वानी ती बारीक गोळा झालेली व तशीच खिशात कोंबल्याने चपटी झालेली ती नोट हातात घेतली.

मी : "आता दोन्ही हातानी मिळून सावकाश ती नोट सरळ करा. थोड्या फार घड्या पडल्या असतील तर हळुवार त्या घालवा"

सर्वानी त्याप्रमाणे केले. मग मी विचारले : "आता सांगा, तुम्ही त्या नोटेला इतकं चुरगाळलं, खिशात कोंबलं, त्यावर बसला सुद्धा, नोट चपटी केली. तरी पुन्हा तुम्हीच सरळ केल्यावर ती नोट ओके झाली न?" मुले एका आवाजात "होssss " म्हणाली.

मग हसून मी सांगितलं की, "आता असं पहा की, जी नोट आजवर तुम्ही प्रेमाने व हळुवारपणे जपून वापरत होता तीच हि नोट! मात्र आता तुम्ही जशी त्या नोटेची बेइज्जती केली, चुरगाळून अपमान केला, खिशात खुपसून त्यावर बसून पार तिची उरली सुरली इज्जत पण घालवली. तरी पुन्हा तुम्हीच ती सरळ केल्यावर पुन्हा पहिल्यासारखी झाली न?

अगदी असेच यापुढं तुम्ही जगात वावरताना या नोटेसारखं जगा. लोक तुमचा अपमान करतील, बेइज्जत करतील, प्रसंगी चार लोकात पाणउतारा करून तुमच्या मनाचा चोळामोळा करतील. त्यामुळे तुम्ही निराश होणार, चिडणार, वैतागणार अन अशावेळी तुमच्याकडे असलेली सारासार विवेक बुद्धी काम करेनाशी होते. योग्य निर्णय घेण्याऐवजी नेमके चुकीचे निर्णय नकळत घेतले जातात.

डीडी क्लास : असे अपमानाचे प्रसंग अनेकदा आयुष्यात येतील. त्यावेळी ही आज चुरगळलेली नोट आठवा. तुम्ही कितीही तिला चुरगळलं तरी तिची "शंभर" ही किंमत कमी झाली नाही. तसेच तुमच्या अपमानित प्रसंगाने तुमची किंमत कमी होणार नाही. उलट अशावेळी शांत राहून थोडा वेळ जाऊ देऊन पुन्हा तुमच्या चुरगळलेल्या मनाला हाताने हळुवार सरळ करा. अन नव्या उमेदीनं कामाला लागा !

मग कळेल की, "अरेच्या, खरेच की, माझी किंमत कमी कुठं झालीय?"
अन जमलं तर एक करा मित्रांनो, ही आजची शंभरची नोट तुमच्या नजरेस् सतत पडेल अशा ठिकाणी (तुमच्या टेबलच्या काचेखाली वगैरे) ठेवून द्या. भविष्यात कधी अपमानाचा प्रसंग आला तर या नोटेकडे पहा. मग 2 मिनिटात तुम्ही शांत व्हाल अन उमेदीने पुन्हा लढायला सिद्ध व्हाल!
@dd

ही कथा धनंजय देशपांडे यांच्या फेसबुक वॉल वरून घेण्यात आली आहे.
खाली त्यांच्या फेसबुक पोस्ट ची लिंक देत आहे.
#DhananjayDeshpande


Motivational Quotes In Marathi For You:

Post a Comment

0 Comments